सातारा, (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 18 तास अभ्यासात घालवत असत. त्यातूनच त्यांच्यासारखे व्यासंगी, ज्ञानवंत व्यक्तिमत्व घडले. त्यांच्या या अध्ययनाच्या सवयीतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी डॉ. आंबेडकर जयंतीदिनी रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात 18 तासांच्या अभ्यास मॅरेथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच राबवला असल्यानेे सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे कौतुक होत असून उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेबांना खरी मानवंदना दिली अशी भावना समाजामधून येत आहेत.
या उपक्रमात प्राध्यापक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांनी 18 तासांच्या अभ्यास मॅरेथॉन उपक्रमात सहभाग घेऊन डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. सकाळी 6 ते रात्री 12 एवढा वेळ सहभागींनी वाचन केले. डॉ. आंबेडकरांना आदरांजली देण्यासाठी व विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक सामाजिक परिवर्तनकर्ते आणि आपल्या राष्ट्राचे एक महान नेते होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या केंद्रस्थानी त्यांचे समर्पण होते. ते अठरा तास अभ्यासात घालवत असत हे सर्वज्ञात सत्य आहे. विद्यार्थ्यांना समान समर्पण करण्याची प्रेरणा मिळावी या उपदेश समजण्याकरिता वाचन करणे किती गरजेचे आहे हे सांगण्याकरिता सदर उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य ए. सी.अत्तार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. आनंद तपासे, प्रा.अनुजा देसाई, प्रा.अमित गवाळे, प्रा.राजश्री तपासे , प्रा.मनीषा उमाप व अभिषेक राजे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमास एकूण 43 विद्यार्थी व शिक्षक यांनी नोंदणी केली होती व इतर अनेकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना हा उपक्रम खूप आवडला व असेच उपक्रम वारंवार घ्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.