नवी दिल्ली – अमेरिकेने रशियावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातले आहेत. रशियातील तब्बल ५०० व्यक्ती आणि संस्थांवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याला शुक्रवारी २ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने आणि रशियातील विरोधी नेते ऍलेक्सी नवालनी यांच्या मृत्यूची प्रतिक्रीया म्हणून हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
रशियाचे अघ्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याकडून परदेशातील आक्रमण आणि देशांतर्गत दडपशाही आणली जात असल्याने रशियावर यापेक्षाही अधिक कठोर निर्बंध आणले जातील, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
आज घातल्या गेलेल्या निर्बंधांमध्ये रशियातील मीर पेमेंट सिस्टीम, वित्तीय संस्था आणि लष्करी औद्योगिक तळ, निर्बंध चकवेगिरी करणार्या संस्था, भविष्यातील उर्जा उत्पादन कंपन्या आणि अन्य क्षेत्रातील औद्योगिक कंपन्यांंचा समावेश आहे. ऍलेक्सी नवालनी यांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या तुरुंग प्रशासनातील अधिकार्यांवरही अमेरिकेने निर्बंध घातले आहेत.
अमेरिकेने घातलेले हे निर्बंध रशियाने धुडकावून लावले आहेत. अमेरिकेच्या या निर्बंधांमुळे रशियाला काहीही फरक पडणार नाही, असे अमेरिकेतील रशियाचे राजदूत ऍन्टनी ऍन्टनोव यांनी म्हटले आहे.