माले (मालदिव) – मालदीवमध्ये इसिस आणि अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या समर्थकांवर अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. मालदीवमधील दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याबद्दल अमेरिकेने 20 व्यक्तींना अटक केले असून 29 कंपन्यांवर बंदी घातली आहे. भारत आणि मालदीवचे संबंध खूप घनिष्ठ आहेत. त्यामुळे भारताला अडचणीत आणण्यासाठी या दोन्ही दहशतवादी संघटनांनी मालदिवमधून कारवाया सुरु केल्या होत्या.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्यांपैकी बरेच जण पत्रकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांवर हल्ले घडवून आणण्यात गुंतले होते. अमेरिका मालदीवमधील दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखणे आणि त्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी तत्पर असेल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
यूएस ट्रेझरी आणि स्टेट डिपार्टमेंट्सने 18 इसिस आणि इसिस- खोरासनचा सूत्रधार आणि मालदीवमधील दोन अल-कायदा ऑपरेटिव्ह तसेच 29 संलग्न कंपन्यांवर बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या व्यक्तींच्या यादीत मोहम्मद अमीनचे नाव देखील आहे, अमीनने इसिस-के साठी तरुणांची भरती केल्याचा आरोप आहे. मोहम्मद अमीनला 2019 मध्ये अमेरिकेने दहशतवादी घोषित केले होते.
यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मिलर म्हणाले की, या दहशतवादी संघटनांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा देणाऱ्या नेटवर्कशी लढण्यासाठी तसेच त्यांच्याकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे.