मोरगाव – प्रस्तावित हेलीकॉप्टरद्वारे अष्टविनायक यात्रेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून 30 भाविकांनी आगाऊ बुकींग केले आहे. यामुळे प्रत्यक्षात सेवा सुरु झाल्यास आणखी प्रतिसाद मिळेल, अशी माहिती ओझरच्या विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली.
पुण्यात सर्व अष्टविनायक मंदिर विश्वस्त मंडळाची आढावा बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता. अनोख्या उपक्रमामुळे गणेश भक्तांना अवघ्या काही तासांतच ही यात्रा पूर्ण करता येणार आहे. राज्यातील पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांत अष्टविनायकाची आठ तीर्थक्षेत्रे आहेत. गणेश सांप्रदयामध्ये या स्थानांना अनन्य साधारण महत्व आहे. ही प्रमुख तीर्थक्षेत्र समजली जातात.
अष्टविनायक तीर्थक्षेत्री राज्यातीलच नव्हे परराज्यातील मंत्री महोदयांपासून ते अति विशेष महत्वाच्या व्यक्तीं श्रींच्या दर्शनासाठी येतात. महत्वाच्या व्यक्तींबरोबरच सामान्यांच्या खिशाला परवडेल, असे तिकीट हेलीकॉप्टरचे असणार आहे. अष्टविनायक यात्रेची संकल्पना ओझर देवस्थानचे मुख्य विश्वस्त गणेश कवडे यांच्या संकल्पनेतून पुढे आणली आहे.
प्रत्येक अष्टविनायक तीर्थक्षेत्री आवश्यक त्या परवानगी घेऊन हेलीपॅड तयार केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच भाविकांची इच्छा फलद्रुप होणार आहे.