नवी दिल्ली – ईव्हीएम मशिन ट्रकमध्ये भरून नेले जात असल्याचा प्रकार मंगळवारी वाराणसीत आढळून आल्यानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमवर पाळत ठेवायला सुरवात केली आहे. सपाचे उमेदवार योगेश वर्मा, तर दुर्बिणीतून ईव्हीएम मशिनवर नजर ठेवून आहेत.
उत्तरप्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या 10 मार्च रोजी होणार आहे. तत्पूर्वी, मंगळवारच्या रात्री वाराणसीमधून ईव्हीएम मशिन ट्रकमध्ये भरून दुसरीकडे नेले जात असल्याची बाब सपा नेत्यांच्या निदर्शनात आली. परंतु, दोन ट्रक पसार होण्यात यशस्वी झाले.
या घटनेमुळे सपासह विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर ईव्हीएम मशिन न सांगता हलविल्या जात असल्याचा आरोप राज्य सरकारवर केला. तसेच आता त्या मतांची सुरक्षा सुध्दा आपल्यालाच करावी लागणार आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी मशिनवर देखरेख ठेवण्यासाठी रूमबाहेर ठिय्या मांडून बसावे, असे आवाहन यादव यांनी केले.
यानंतर, सपाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील मशिन ठेवली आहे त्या रूमबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत. सपाचे उमेदवार योगेश वर्मा हे तर गाडीत बसून दुर्बिणच्या माध्यमातून रूमवर पाळत ठेवून आहेत. नेता योगेश वर्मा यांच्याप्रमाणेच, सपाशी संबंधित इतर लोकही ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवून आहेत आणि निकालापूर्वी ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
एवढेच नाही तर वाराणसीतील ईव्हीएम मशिनच्या गडबडीबाबत उच्च न्यायालयात जाणार असल्याचे एसपींनी सांगितले आहे. पक्षाच्या वतीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार आहे.