नवी दिल्ली – सेमीकंडक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक सुट्या भागाचा पुरवठा सुधारू लागला आहे. त्यामुळे ग्राहकांना आवडणाऱ्या कार कंपन्या तयार करू लागल्या आहेत. परिणामी जून महिन्यामध्ये कंपन्यांनी वितरकांना विकलेल्या म्हणजे घाऊक विक्रीत 19 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.
वाहन उत्पादकांच्या सियाम या संघटनेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की जून महिन्यामध्ये 2,75,788 इतकी प्रवासी वाहने विकली आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात केवळ 2,31,633 एवढी प्रवासी वाहने विकली गेली होती.
त्याचबरोबर दुचाकी वाहनाच्या विक्रीतही वाढ होऊन जून महिन्यामध्ये 13,0 8,764 एवढी दुचाकी विकल्या गेल्या गेल्या. वर्षी जून महिन्यामध्ये 10,60 565 एवढ्या दुचाकी विकल्या गेल्या होत्या. जून महिन्यामध्ये 26,701 तीन चाकी वाहने विकली गेली. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये फक्त 9,404 तीन चाकी वाहने विकली गेली होती.
जून महिन्यामध्ये एकूण वाहन विक्री 16,11,300 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये 13,01,602 इतकी एकूण वाहन विक्री झाली होती. रशिया- युक्रेन युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवरील प्रभाव कमी होऊ लागला आहे. हे दोन देश वगळता इतर देशातील व्यापार आता वाढू लागला आहे.
त्यामुळे वाहनांच्या सुट्या भागाची आयात निर्यात होऊ लागली आहे. या कारणामुळे वाहन कंपन्यांना आवश्यक सुटे भाग उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे वाहन निर्मिती आणि विक्रीत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यामध्ये टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनीही सुट्या भागाचा पुरवठा वाढत असल्यामुळे वाहन उत्पादन वाढत असल्याचे सांगितले होते. मात्र परिस्थिती अजूनही सुरळीत झालेली नाही. त्यामुळे वाहन कंपन्यांना याबाबत सावध राहावे लागत असल्याचे सांगितले जाते.