मुंबई- अमेरिकेच्या महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार असल्यामुळे अमेरिकेसह जागतिक शेअर बाजारामध्ये जोरदार विक्री चालू आहे. भारतातील महागाई अजूनही उच्च पातळीवर असल्याची आकडेवारी काल जाहीर झाल्यानंतर भारतीय बाजारातही आज सलग तिसऱ्या दिवशी विक्री होऊन निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 372 अंकांनी कमी होऊन 53,514 अंकांबंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 91 अंकांनी म्हणजे 0.57 टक्क्यांनी कमी होऊन 15,966 अंकावर बंद झाला.
अमेरिकेत महागाई 40 वर्षाच्या उच्चांकावर आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये फेडरल रिझर्व्ह पाव टक्क्याची व्याजदर वाढ करणार असल्यामुळे गेल्या 15 दिवसांमध्ये जागतिक शेअर बाजारातील वातावरण खराब आहे. भारतातील किरकोळ किमतीवरील आधारित महागाईचा दर 7 टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे गुंतवणूकदार निराश झाले असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
कालच्याप्रमाणे आजही तेल आणि नैसर्गिक वायू, बॅंकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. इंडसइंड बॅंक, एचडीएफसी, भारती एअरटेल, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, टायटन, एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपन्यांनी आज सपाटून मार खाल्ला.
हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट, सन फार्मा, कोटक महिंद्रा बॅंक, एनटीपीसी, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. भारतातील औद्योगिक उत्पादन वाढले असल्याची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे सकाळी निर्देशांकात वाढ झाली होती.
मात्र जगभरातून शेअर बाजार निर्देशांक कमी होत असल्याचे वृत्त आल्यानंतर दुपारी मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे निर्देशांक घसरले असल्याचे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. दरम्यान कालही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 1,565 रुपयाची विक्री करून नफा काढून घेतला