पुणे – खान आणि उत्खनन क्षेत्रातील जागतिक पातळीवरील बलाढ्य कंपनी वेदांत भारतामध्ये सेमीकंडक्टर निर्मितीसाठी मोठा प्रकल्प काढणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी वेदांत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आठवड्यात पुणे परिसराला भेट देऊन प्रकल्पाच्या सोयीची जमीन आणि सुविधा उपलब्ध आहेत का याची चाचपणी केली.
केंद्र सरकारने या सेमीकंडक्टर आणि तत्सम उत्पादन देणाऱ्या कंपन्यांना उत्पादन आधारित अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत वेदांत समूह आणि केंद्र सरकारकडे प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे. पुण्याजवळ सेमीकंडक्टरचा उद्योग उभा राहू शकतो का याची पाहणी या अधिकाऱ्यांनी केली. हा प्रकल्प विशाल आहे. त्यासाठी आवश्यक जमीन आणि पायाभूत सुविधा वेदांत कंपनीला अपेक्षित आहेत. त्या दृष्टिकोनातून या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुण्याला भेट दिल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र यासंदर्भात वेदांत समूहाने कसलीही माहिती जारी केली नाही.
गेल्या आठवड्यात वेदांत समूहाने भारतामध्ये सेमीकंडक्टर आणि तत्सम उद्योगांमध्ये सुरुवातीला 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कालांतराने ही गुंतवणूक 20 अब्ज डॉलर पर्यंत वाढविली जाऊ शकते. कंपनीच्या वेळापत्रकानुसार 2024 मध्ये डिस्प्लेचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. त्याचा वापर मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जातो. 2025 पासून सेमीकंडक्टरचे उत्पादन होणे अपेक्षित आहे.
सुरुवातीला 28 नॅनोमीटरच्या इलेक्ट्रॉनिक चिप्स बनविण्यात येणार आहेत. त्याचा वापर मोबाईल, ऊर्जा आणि वाहन क्षेत्रात केला जातो. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन क्षेत्र एकवटलेले आहेत. वेदांतने 2020 मध्ये महाराष्ट्रामध्ये दहा अब्ज गुंतवणुकीचा एलसीडी प्रकल्प उभारण्याचा यापूर्वी प्रयत्न केला होता. मात्र सहयोगी कंपनी न मिळाल्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही.