मुंबई – करोना आणि रशिया -युक्रेन युद्धामुळे वाहनासाठी लागणाऱ्या सेमी कंडक्टरचा पुरवठा विस्कळीत झाला होता. आता सेमी कंडक्टरचा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे वाहन कंपन्यांचे उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर वाहन कंपन्याकडून वितरकांना विकल्या जात असलेल्या वाहनाच्या संख्येत म्हणजे घाऊक विक्रीत वाढ होऊ लागली आहे.
सेमीकंडक्टर नसल्यामुळे कंपन्यांना पाहिजे त्या वाहनांचे उत्पादन करता येत नव्हते. त्यामुळे ग्राहकांना पाहिजे ती वाहने उपलब्ध होत नव्हती. अशा परिस्थितीत बऱ्याच वाहनांचा वेटिंग पिरिएड वाढलेला आहे. मात्र आता रशिया- युक्रेन युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवरील परिणाम कमी झाला आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांना ग्राहकांना हवी ती वाहने तयार करता येऊ लागली आहेत. त्यामुळे आगामी काळात वाहनांचा वेटिंग पिरिएड कमी होण्याची शक्यता वाहन उत्पादन कंपन्यांनी व्यक्त केली.
दरम्यान सिआम या वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेने ऑगस्ट महिन्यामध्ये घाऊक प्रवासी वाहन विक्रीत 21 टक्के वाढ झाल्याचे जाहीर केले. या महिन्यात कंपन्यांनी वितरकांना 2,81,210 प्रवासी वाहने विकली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये केवळ 2,32,224 प्रवासी वाहने विकली होती. ऑगस्ट महिन्यामध्ये कंपन्यांनी वितराकांना एकूण 15,27,429 दुचाकी विकल्या. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये ही संख्या 13,38,740 इतकी होती.
ऑगस्ट महिन्यात मोटरसायकलची विक्री 23 टक्क्यानी तर स्कूटरची विक्री 10 टक्क्यांनी वाढली आहे. तीन चाकी वाहनांची विक्री 63 टक्क्यांनी वाढून 38,369 इतकी झाली आहे. सिआमचे महासंचालक राजेश मेनन यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यातील वाहन विक्री समाधानकारक आहे. त्याचबरोबर आगामी काळात येणाऱ्या उत्सवांमध्ये वाहन विक्री वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कंपनी आणि वितरकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यानच्या काळात महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने आणि व्यावसायिक बॅंकांनी व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे वाहनासाठीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी मागणी जास्त असल्यामुळे आगामी काळातही वाहनांच्या विक्रीवर व्याजदरवाढीचा परिणाम होणार नाही.