बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता लवकरच वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. या कॉमेडी-ऍक्शन वेब सिरीजचे नाव “हंड्रेड’ असे आहे. यात लारा दत्त पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब मालिकेत “सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
या “हंड्रेड’ वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज नुकताच प्रदर्शित झाला असून यात लारा दत्ता दमदार भूमिका साकारत असल्याचे दिसून येते. लारा दत्ता या पहिल्या वेबसिरीजला सलमान खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रमोट केले आहे. वेब सीरिजचे पोस्टर शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ही माझी आवडती नायिका आणि फिल्म पार्टनर आहे. तिचा हा चित्रपट नक्की पहा.’ सलमानची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
ही वेब सिरीज कॉमेडी आणि ऍक्शनने परिपूर्ण आहे. ही कथा दोन भिन्न स्त्रियांभोवती फिरत आहे. या मालिकेत मुंबईतील चाळी आणि टोळ्यांसुद्धा दाखविण्यात आल्या आहेत. यात लारा दत्ता आणि रिंकू राजगुरू व्यतिरिक्त करण वाही, सुधांशू पांडे, परमीत सेठी, रोहिणी हट्टनागिरी, अरुण नलावडे आणि मकरंद देशपांडे आदी कलाकारांची फौज आहे. या वेब सिरिजचे सह-दिग्दर्शन रुचि नारायण, आशुतोष शाह आणि ताहिर शब्बीर यांनी केले आहे.