बोअरवेलमुळे जमिनीची चाळण

पर्जन्यमान कमी झाल्याने कितीही खोदले तरी पाणी लागेना
आकाश दडस

बिदाल – दिवसेंदिवस पाऊसकाळ कमी होत असून पाणी अडवूनही ते जमिनीतच मुरत नसल्याने बोअरवेल कितीही फूट खोल खोदली तरी पाणी लागेना झाले आहे. तरीही शेतकरी पाणाड्यांच्या भुलथापांना बळी पडून शेकडो कूपनलिका खोदत असून केवळ मे महिन्यात तालुक्‍यात शेकडो बोअरवेल खोदण्यात आल्या. पाणी न लागल्याने त्यावरील करोडोंचा खर्च फुकट गेला आहे.

माण तालुक्‍याच्या दुर्गम, अतिदुर्गम, वाड्या-वस्त्यांवर सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. बहुतांश गावांत एक ड्रम पाण्यासाठी 100 रुपये मोजावे लागत आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वत:ची बोअरवेल असावी, या भावनेतून शेतकरी बोअरवेल खोदण्याचा विचार करतो. मात्र, शास्त्रीय पद्धतीने पाणी न शोधता आजूबाजूच्या गावांतील पाणी दाखवणारे (पाणाडे) यांच्या मागे लागून त्यांना आपला जागेतून फिरवून पाणी दाखवण्याची विनंती करतो. 10 हजारांपासून ते 25-50 हजारांपर्यंत कुपनलिका खोदण्यासाठी खर्च येतो. याशिवाय पाणाड्यांचा “मानपान’ वेगळाच.

पाणाडीही भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतात. दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत पाणाडी व बोअर व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत असतो. मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमिनीतील भूजल पातळी खालावली जाते. त्यावेळी शेतकरी जमिनीतील पाणी पातळी पाहण्यासाठी पाणाड्या, भूजल शोधक यंत्र, तांब्याची तार आदी साधनांचा वापर करतात. या काळात पाणी पातळी खालावलेली असल्याने अशा वेळेस पाणी लागले, तर ते कायम टिकते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. भूगर्भातील पाणी तपासण्यासाठी पाणाड्याला बोलविले जाते. पाणाडी ज्याठिकाणी पाणी उपलब्ध आहे, असे ठिकाण दाखवतो. शेतकरी त्याठिकाणी बोअर मारतात किंवा विहीर खुदाई करतात. भूगर्भातील पाणी दाखवण्यासाठी पाणाडी विविध मार्गांचा अवलंब करतात.

पाणाड्यांच्या अंदाजानुसार काही ठिकाणी बोअर, विहिरीला भरघोस पाणी मिळते. मात्र, काही ठिकाणचा अंदाज चुकतो. बोअर कितीही खोल मारले किंवा विहिरीची कितीही खुदाई केली तरी पाणी लागत नाही. त्यामुळे ज्या पाणाड्याचा अंदाज अचूक त्या पाणाड्याला शेतकऱ्यांकडून जास्त सुपारी मिळते. सध्या नामांकित पाणाड्यांनाही सुपारी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. आत्ता बोअर मारले किंवा विहीर खोदली तर पाणी लागेल; पण ते पाणी टिकेल की नाही याविषयी शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. शिवाय काही शेतकऱ्यांनी धाडसाने बोअर मारण्याचे ठरवले तरी बोअर मारणारे मशीन अवजड असल्याने सध्याच्या परिस्थितीत ते मशीन शेतात जाऊ शकत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.