शिक्षणासोबत नि:शुल्क पोहण्याचा सराव

सातारा – सध्या शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना पोहण्याचे सराव सुरू केले आहेत. शहरी भागात भरमसाठ शुल्क आकारणी करून मुलांना पोहण्याचे सराव करण्यास भाग पाडले जात आहे. मात्र सावंतवाडी ता. जावळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक शिवाजी शिवणकर हे गरीब विद्यार्थ्यांना स्वखर्चातून पोहण्याचे धडे देत आहेत. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाले आहेत. त्यामध्ये शहरी भागात कालवा, विहिरी, पोहण्याची साधने उपलब्ध नसल्यामुळे अनेक जण खाजगी तलावावर गर्दी करू लागल्या आहेत.येथील शाहू स्टेडियम व खासगी तलाव आहेत. तेथे महिन्याचे शुल्क 800 रुपये घेतले जाते. पोहण्यास येत नसल्यास आणखी अधिक शुल्क आकारला जाते.

मुलांना पोहण्यास आले पाहिजे यासाठी पालकवर्गाची धावपळ सुरू झाली आहे. भरमसाठ शुल्क भरून पालक रांगा लावून प्रवेश घेत आहेत. आपल्या मुलांना पोहता यावे यासाठी धडपडताना दिसत आहेत. हे सर्व सुरू असताना सातारा जिल्हा परिषद सावंतवाडी सारख्या ग्रामीण भागातील शाळेत स्वतः मुख्याध्यापक शिवाजी शिवणकर यांनीच गरीब विद्यार्थ्यांसाठी पोहण्याचे धडे देण्याचे ठरवले आहे. या शाळेत पहिली ते चौथी तेरा विद्यार्थी शिकत आहेत. ग्रामीण भागातील शाळा असल्यामुळे येथे विद्यार्थी संख्या कमी आहे. परंतु नाराज न होता मुख्याध्यापक शिवाजी शिवणकर यांनी विद्यार्थ्यांना धरणाच्या कालव्यामध्ये पोहण्यास शिकवण्यासाठी सुरुवात केली आहे. प्रत्येकजण प्लास्टिक रिकामा कॅन पाठीला बांधत पोहण्याचे धडे शिवणकर गुरुजी यांच्याकडून नि:शुल्क शिकत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थी गरीब व हुशार असतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे या भावनेतून विद्यार्थ्यांना शिकवत आहे. त्यासाठी त्यांना त्यांची पत्नी उषा शिवाजी शिवणकर या सुद्धा मदत करीत आहेत. त्याही याच शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिवणकर दाम्पत्याचा हा अनोखा उपक्रम पाहून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कैलास शिंदे,शिक्षण सभापती राजेश पवार, प्राथमिक शिक्षण अधिकारी सौ. प्रभावती कोळेकर हे जिल्हा परिषद शाळांसाठी लवकरच अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याबाबत काही शिक्षकांना सूचना करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या अनोख्या उपक्रमामुळे अनेक इंग्लिश मीडिअम स्कूल व हायफाय शिक्षण संस्था चालक काही गरीब व हुशार विद्यार्थ्यांना सवलत देऊन पोहण्याचे शिक्षण देण्यासाठी विचार करतील अशी अपेक्षा सेवानिवृत्त शिक्षक सुरेश खुडे, बा. ग. धनावडे, जागृती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार जगताप यांनी व्यक्त केली आहे. सध्या खासगी पोहण्याचा तलावात अडीच हजार मुलं प्रशिक्षण घेत आहेत तर ग्रामीण भागातील सुमारे वीस हजार मुलं कालवा, विहीर, पाझर तलाव, नदीमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेतले जात असले तरी पालक वर्गानी मुलांना एकटे-दुकटे पोहण्यास पाठवू नये असे आवाहन शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेले ऍड.विलास वहागावकर, प्रेमानंद जगताप-सायगावकर यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.