महापौरांची प्रशासनावर टीका
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील करोना संशयितांचे सुरू असलेले सर्वेक्षण अत्यंत ढिसाळ असल्याची टीका महापौर माई ढोरे यांनी केली. अधिकाऱ्यांमध्ये नसलेला समन्वय आणि गांभीर्याच्या अभावामुळेच हा प्रकार घडत असल्याचेही त्या म्हणाल्या.
पालिकेच्या वतीने करोनाचे रुग्ण सापडले आहेत त्या परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षक, पालिकेचे कर्मचाऱ्यांकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र पालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याच्या मुद्यावर महापौरांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्या बोलत होत्या.