वैद्यकीय साधनांचा तुटवडा! मास्क, सॅनिटायझर, ऑक्‍सिमीटरच्या किमतीत मोठी वाढ

पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच पुन्हा एकदा वैद्यकीय साधनांचा तुटवडा जाणवू लागला आहे. वाढत्या मागणीमुळे बहुतांश एजन्सीकडे विविध साधनांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, हॅंडग्लोज, ऑक्‍सिमीटर, थर्मलगन आदी वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात व राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच करोनाने मृत्यू पावणारांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात करोनाविषयी भीती निर्माण झाली असून सुरक्षा साधनांचे महत्त्व नागरिकांमध्ये वाढल्याने मास्क, सॅनिटायझर, वाफेचे मशीन, हॅंडग्लोज, ऑक्‍सिमीटर, ताप मोजण्यासाठी थर्मामीटर तसेच करोनावर मात करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या यांचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे.

दवा मार्केटमध्ये बहुतांश एजन्सीमध्ये वरील गोष्टी उपलब्ध नाहीत. मागील महिन्याच्या तुलनेत सध्या आवश्‍यक वैद्यकीय साधनांच्या किमतींमध्ये दोन ते तीन पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सर्जिकल साहित्याची किंमत ही खरेदीच्या कित्येक पटीने जास्त असते. त्यामुळे एमआरपीच्या दरात विक्री केली तर ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. प्रत्येक ठिकाणी ग्राहकांना सर्जिकल साहित्य वेगवेगळ्या किमतीमध्ये उपलब्ध होत असल्याने ग्राहकांच्या मनात नेमकी या प्रोडक्‍टची खरी किंमत काय असेल, आपल्याला गंडा तर घातला नाही ना असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

मेडिकलला औषधे व सार्जिकल साहित्याचा पुरवठा करणाऱ्या एजन्सींकडून परिस्थितीप्रमाणे किमतीत बदल करुन विक्री केली जाते. त्यामुळे मेडिकल स्टोअर्सकडून देखील ग्राहकांना कमी अधिक दराने वैद्यकीय साहित्यांची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये वैद्यकीय साहित्याची नेमकी किंमत काय असेल अशी उत्सुकता आहे.

मंगळवारी (दि. 20) चिंचवड दवा मार्केटमध्ये दैनिक प्रभातच्या वतीने पाहणी केली असता, हॅंडग्लोज, ऑक्‍सिमीटर, थर्मलगन, मास्क, सॅनिटायझर यांचा तुटवडा जाणवत आहे. होलसेल मार्केटमध्ये सॅनिटायझरमध्ये देखील 25 रुपये एमआरपीचे सॅनिटायझर उपलब्ध नव्हते. तसेच जे हॅंडग्लोज मागील महिन्यात तीनशे ते चारशे रुपयांना किमतीला मिळत होते ते सध्या पाचशे ते सातशे रुपये दराने विकले जात आहेत. तर निळ्या हॅंडग्लोजच्या किमती हजार ते बाराशे रुपयांवर पोहचल्या आहेत. त्यामुळे मेडिकलवाल्यांसमोर देखील कोणत्या दराने विक्री करावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

बिल मिळत नाही
वैद्यकीय औषधे तसेच सर्जिकल साहित्याची विक्री करणाऱ्या बहुतांश एजन्सीकडून सर्जिकल साहित्याचे बिल दिले जात नाही. त्यामध्ये हॅंडग्लोज, मास्क, सॅनिटायझर यांचे बिल दिले जात नाही. रोख पैसे देऊन साहित्य खरेदी करावी लागत आहे. तसेच ऑक्‍सिमीटर, थर्मलगन यांची कोणतीही गॅरंटी, वॉरंटी न देता पैसे घेऊन साहित्य हातात दिले की आमची जबाबदारी संपली. पुढे जाऊन ते मशीन चालणार की बंद पडणार ते मेडिकलवाले आणि ग्राहक यांनी पाहून घेणे असा संदेश दिला जात आहे.

मागणी वाढल्याने तुटवडा
याबाबत दवा बाजारमधील वितरकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लॉकडाऊन झाल्यापासून वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच मार्केटमधून अचानक मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने सर्जिकल साहित्यांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच ट्रान्सपोर्ट खर्च व कंपनीकडून अधिक दराने औषधे व सर्जिकल साहित्य मिळत असल्याने ऑक्‍सिमीटर, सॅनिटायझर, थर्मलगन आदींची किंमत वाढली आहे.

सध्या आम्हाला एजन्सीकडून सर्जिकल साहित्य चढ्या दराने खरेदी करावे लागत आहे. मागील महिन्यात होलसेलमध्ये काही कंपनीचे ऑक्‍सिमीटर पाचशे ते हजार रुपयांपर्यंत वॉरंटीसह मिळत होते. परंतु सध्या पाचशे सहासे रुपयांचे ऑक्‍सिमीटर दीड हजार ते दोन हजार रुपयांनी खरेदी करावे लागत आहेत. ते देखील माल उपलब्ध नसल्याने मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांचा मेडिकलवाले जास्त पैसे लुटत आहेत असा समज होत आहे. परंतु सध्या एजन्सीकडूनच चढ्या दराने खरेदी करावी लागत असल्याने मेडिकलवाल्यांचा नाइलाज आहे.
– अश्‍विनी जमदाडे, केमिस्ट

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.