पुणे -‘डीआरडीओ’चे कंत्राट मिळवण्यासाठी आलेल्या एका महिलेशी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपापत्रात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही.
राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कुरुलकर यांच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात 1 हजार 837 पानांचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी समाजमाध्यमात केलेल्या संवादाची प्रत राज्य दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात जोडली आहे. या संवादातून कुरुलकर यांनी झाराबरोबर “अग्नि’, “ब्राह्मोस’, “रुस्तम’ या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
डीआरडीओतील विविध कामांचे कंत्राट मिळावे म्हणून महिलेने कुरुलकर यांच्याशी जवळीक साधली होती. संबंधित महिला आणि कुरुलकर यांच्यातील संभाषण तपासात मिळाले आहे. याबाबतचा उल्लेख एटीएसने दोषारोपपत्रात केला आहे. दरम्यान, संबंधित महिलेने अद्याप कोणतीही तक्रार दिली नाही. महिलेने तक्रार दिल्यास कुरुलकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच या गुन्ह्यात कलमवाढ होण्याची शक्यता एटीएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर तपासात अनेक बाबी उजेडात आल्या होत्या. एटीएसच्या पथकाने महिलेची चौकशी केली होती.