नवी दिल्ली – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने आज ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या चाचणीदरम्यान, सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य करण्यात आली. (India carries out successful flight test of indigenous technology cruise missile)
रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेल्या टेलीमेट्री सारख्या अनेक रेंज सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्राच्या कामगिरीचे परीक्षण करण्यात आले. यामुळे उड्डाण मार्गाचा संपूर्ण माग घेता आला. तसेच भारतीय हवाई दलाच्या सुखोई विमानातूनही क्षेपणास्त्राच्या उड्डाणावर लक्ष ठेवण्यात आले होते.
क्षेपणास्त्राने दिशादर्शन यंत्रणेचा वापर करून इच्छित मार्गाचा अवलंब केला आणि अत्यंत कमी उंचीवरील समुद्र-स्किमिंग उड्डाणाचे प्रात्यक्षिक केले. या यशस्वी उड्डाण चाचणीने बेंगळुरू येथील गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने,विकसित केलेल्या स्वदेशी प्रोपल्शन प्रणालीची विश्वसनीय कामगिरीदेखील सिद्ध केली आहे.
बेंगळूरूस्थित डीआरडीओ प्रयोगशाळेतील वैमानिकी विकास संस्थेनेसह इतर प्रयोगशाळा तसेच भारतीय उद्योगांच्या योगदानासह हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आयटीसीएमच्या यशस्वी उड्डाण-चाचणीसाठी डीआरडीओच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.