पुणे – राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने (एनआयए) कोंढव्यात शनिवारी कारवाई केली. यात दहशतवाद्यांनी वापरलेली वाहने जप्त करण्यात आली. “एनआयए’चे पथक शनिवारी सकाळी कोंढव्यात दाखल झाले. पुणे, मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरात बाॅम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना एनआयए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मागील वर्षी पुण्यातून अटक केली होती. दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांनी वापरलेली वाहने कोंढव्यात ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एनआयएचे पथक कोंढव्यात आले.
मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्त्वाच्या शहरात बाॅम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर दि. १६ मार्च रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत जप्त केली.
एनआयएने मोहंमद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहंमद इम्रान मोहंमद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), मोहंमद युनुस मोहंमद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) यांना अटक केली.
मोहंमद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहंमदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता. २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडले. त्यानंतर त्याला तपासासाठी “एनआयए’च्या ताब्यात देण्यात आले.
पुणे, सातारा अन् कोल्हापूर
१. दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील एका वस्त्रदालनात दरोडा टाकत काही रक्कम मिळवली होती. त्यातून बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले.
२. बाॅम्ब कसा तयार करायचा, याबाबतचे प्रशिक्षण त्यांनी कोंढव्यात घेतले होते.
३. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाॅम्बस्फोट केले होते.
४. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते.
५. “एनआयए’च्या पथकाने कोंढवा-मिठानगर परिसरातील इमारत जप्त केली.