सातारा – विधानसभा निवडणुकीपूर्वी दीपक पवार यांनी कुडाळ जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने या गटातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या गटासाठी दि. 12 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
दीपक पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे कुडाळ जिल्हा परिषद गटाची जागा रिक्त झाली होती. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी दि. 18 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर केली असून त्यामध्ये कुडाळ जिल्हा परिषद गटाचा समावेश आहे. दि. 22 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या अधिसूचना व निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत.
दि. 22 ते 27 नोव्हेंबर (सार्वजनिक सुट्टी वगळून) संकेतस्थळावर भरण्यात आलेली नामनिर्देशपत्रे निर्वाचन अधिकारी स्वीकारणार आहेत. दि. 28 रोजी सकाळी 11 वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून त्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत दि. 4 डिसेंबर असून त्याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान आणि शुक्रवार, दि. 13 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.