ज्योतिरादित्य यांच्याविरोधात ‘कृष्ण’लिला; कार्यकर्त्यानेच केला पराभव

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत एकटया भाजपने 303 जिंकत अभूतपूर्व यश मिळवले आहे. या विजयी लाटेमध्ये कॉंग्रेसचे अनेक प्रस्थापित आणि दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. मध्य प्रदेशमधील बडे नेते आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य सिंधिया यांचा गुणा मतदारसंघात कृष्णा पाल यादव यांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे ज्योतिरादित्य यांचा पराभव करणारे कृष्णा हे कधीकाळी कॉंग्रेसचेच कार्यकर्ते होते.

कृष्णा यादव हे नाव मध्य प्रदेशमधील प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्याला ठाऊक असणारे नाव. कारण कृष्णा हे ज्योतिरादित्य यांचे निकटवर्तीय होते. केपी या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा यांनी मागील अनेक वर्षांपासून ज्योतिरादित्य यांना मिळेलेल्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. अनेक वर्ष ज्योतिरादित्य यांच्यासोबत असल्याने केपी यांना काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंगावली मतदार संघातून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणी त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या केपी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केला.

विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये गेलेल्या केपी यांना काही महिन्यांमध्येच भाजपने थेट ज्योतिरादित्यंविरोधात लोकसभेचे तिकीट दिले. 45 वर्षीय कृष्णा हे पेशाने डॉक्‍टर आहेत. कृष्णा यांचे वडिलही कॉंग्रेसमध्येच होते. कृष्णा यांना ज्योतिरादित्य यांच्याविरोधात तिकीट देण्यात आले ज्योतिरादित्य सहज जिंकतील, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती. मात्र कृष्णा यांनी ज्योतिरादित्य यांना अगदी प्रचारापासूनच कडवी झुंज दिली. मतमोजणीमध्येही त्यांनी अनेक ठिकाणी ज्योतिरादित्य यांना मागे टाकत आघाडी मिळवून शेवटपर्यंत ती टिकवत 1 लाख 23 हजार मतांनी मोठा विजय मिळवला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.