ऍमनोरा शाळेवरील गुन्हा मागे घ्या

महापालिका अधिकाऱ्यांचे पोलिसांना पत्र

पुणे – वाढीव शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश देण्याची तयारी ऍमनोरा शाळेने दर्शविली आहे. यामुळे या शाळेवरील गुन्हा मागे घ्यावा, अशा आशयाचे पत्र पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सहायक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दाखल केले आहे.

वाढीव शुल्क न भरल्यामुळे शाळेने विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची कारवाई केली होती. त्यांचे टीसी थेट पोस्टानेच घरी पाठविले होते. याविरुद्ध सोनल कोद्रे, धीरज गेडाम, वर्षा उनउने, स्वाती रानडे व इतर पालकांनी मुलांना शाळेत पुन्हा प्रवेश द्यावा यासाठी शिक्षण विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. शाळा प्रशासनाने “आरटीई’ 2009 च्या कायद्याचा भंग केला असल्याने शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही पालकांकडून करण्यात आली होती.

या तक्रारींची दखल घेत पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी पालकांच्या तक्रार अर्जानुसार व यापूर्वीच्या शाळेच्या चौकशी अहवालानुसार शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याता यावा, असे आदेश महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी दौंडकर यांना दिले होते. त्यानुसार दौंडकर यांनी सहायक प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत पोलीसांना शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याबाबतचे पत्र दिले होते.

दरम्यान, शाळेने संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सकारात्मता दाखविली आहे. त्यामुळे शाळेवरील गुन्हा मागे घेण्यात यावा, अशा सूचनाचे पत्र राऊत यांनी गुरुवारी (दि.23) महापालिका अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी तत्काळ गुन्हा मागे घेण्याचे पत्र पुन्हा पोलिसांना दिले आहे. ही माहिती अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.