पुणे – मुंबई इंडियन्सच्या ज्युनिअर गटाच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या पुणे फेरीत 16 वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत सेठ दगडूराम कटारिया प्रशालेने एंजल मिकी मिनी प्रशालेचा 110 धावांनी पराभव करून विजेतेपदाचा मान मिळविला.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेठ दगडूराम कटारिया प्रशालेने 181 धावा केल्या. त्यात महत्त्वाचा वाटा सलामीचा फलंदाज क्रिश शहापूरकरने केलेल्या अर्धशतकाचा होता. त्याने 38 चेंडूत दहा चौकार व एक षटकारासह 60 धावा केल्या. त्याला शिवम मानेने 45 धावा करून सुरेख साथ दिली. क्रिश शहापूरकरने प्रथम कृष्णा देवतरसेच्या साथीत सलामीला 44 धावांची तर शॉन तारूच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 40 धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तर देताना शिवम माने व क्रिश शहापूरकरने प्रत्येकी चार गडी बाद करताना केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे एंजल मिकी मिनी प्रशालेचा डाव 71 धावांत आटोपला.
या स्पर्धेतील अंतिम सामन्याचा मानकरी, उत्कृष्ट फलंदाज आणि स्पर्धेचा मानकरी ही तीनही पारितोषिके क्रिश शहापूरकरने मिळवली. त्याने या स्पर्धेत चार सामन्यांत एका शतकासह सर्वाधिक 231 धावा करताना एकूण 483 धावा केल्या आहेत. याशिवाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा मान आर्य पानसेने तर, उत्कृष्ट यष्टिरक्षक हा मान कृष्णा देवतरसेने पटकाविला.
संक्षिप्त धावफलक –
सेठ दगडूराम कटारिया प्रशाला – 37.4 षटकांत सर्वबाद 181. (क्रिश शहापूरकर 60, शिवम माने 45, ऋतुराज रोकडे 19, क्रिश बिरे 2-20, ऋषिकेश भांडे 2-24, ओम पलांडे 2-40, संस्कार बब्बे 1-7) वि. वि. एंजल मिकी मिनी प्रशाला – 17.1 षटकांत सर्वबाद 71. (क्रिश बिरे 27, शिवम विघ्ने 19, शिवम माने 4-8, क्रिश शहापूरकर 4-19, रुद्र मगरदेशमुख 2-23).