पुणे – नगरसेवक किरण दगडे पाटील व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे व चौथ्या केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील टेनिस स्पर्धेत वेद मोघे, अभिराम निलाखे, देवांशी प्रभुदेसाई आणि सिमरन छेत्री या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत अंतिम फेरीत 12 वर्षांखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित वेद मोघे याने अर्जुन वेल्लूरीचा 4-2, 1-4, 4-0 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात देवांशी प्रभुदेसाई हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुर्गा बिराजदारचा 4-0, 4-0 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत अभिराम निलाखे याने अवनीश चाफळेचा 4-2, 4-0 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात सिमरन छेत्री हिने देवांशी प्रभुदेसाईचा 4-1, 4-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सिमरन डीपीएस शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून महाराष्ट्रीय मंडळ येथे प्रशिक्षक धरणीधर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.