कोपरगाव : तालुक्यातील १४ लाख कोंबड्यांचा जीव टांगणीला….

कोपरगाव(प्रतिनिधी) – देशात बर्ड फ्लुने थैमान घातले आहे. त्याची लागण महाराष्ट्रात झाली आणि आता नगर जिल्ह्यातील पाथर्डीत शेकडो कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याने कोपरगाव तालुक्यातील पोल्ट्री फार्मधारकांची झोप उडाली आहे.

तालुक्यातील १४ लाख ४४ हजार कोंबड्यांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. जर तालुक्यात बर्ड फ्लुची लागण झाली तर या कोंबड्यांचा जीव धोक्यात असणार आहे. बर्ड फ्लुची लागण होणार नाही किंवा त्यामुळे पक्षांचा मृत्यु होणार नाही याची दक्षता पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने घेतली जात आहे.
तालुक्यात सध्या पोल्ट्री फार्मधारकांना पशुवैद्यकीय यंत्रणेकडून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना कोपरगाव तालुका लघु पशुचिकित्सालयाचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी केल्या आहेत.

डॉ. थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पशुपक्षी या बर्ड फ्लुच्या साथीतून वाचवण्यासाठी पूर्व तयारी सुरू केली आहे. कोपरगाव पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. दिलीप दहे, पशुधन अधिकारी श्रद्धा काटे यांनी तालुक्यासाठी स्वतंत्र पाच पशुवैद्यकीय पथके तयार केले असुन त्यात एक पशुधन अधिकारी, २ पर्यवेक्षक अधिकारी व सहाय्यक यांचा सामावेश आहे.

१५ जनाचे ५ पथके तालुक्यात कुठे पक्षी मृत्यु पावले आहेत का याची तपासणी करुन वैद्यकीय अहवाल तयार करीत आहेत. जर चुकुन एखादा पक्षी मृत आढळला तर तो कोणत्या कारणाने मृत्यू झाला याचा शोध घेवून त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवणार असल्याने बर्डफ्लुचे संकट येण्यापुर्वी पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज झाल्याची माहीती. डॉ. दिलीप दहे यांनी दिली आहे.

तालुक्यात रांजणगाव देशमुख, जवळके, अंजनापुर, बहादरापुर या भागात सर्वाधिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी आहेत शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत या भागात शेतीला पाणी कमी असल्याने शेतकरी कुक्कुटपालनाकडे वळाले आहेत.

कोळपेवाडी, टाकळी, रवंदा, धामोरी सह अनेक गावातील शेतकरी कुक्कुटपालन व्यवसायाकडे आकर्षित  होवून लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. शेतातील पिक पाण्याचा भरोसा नसल्याने कुक्कुटपालन करून चरितार्थ भागवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर पुन्हा आसमानी संकट घोंगावत आहे. १ हजारा पासुन २० हजार पक्षी असलेले पोल्ट्री फार्म तालुक्यात आहेत. ३२३ शेतकरी हा व्यवसाय करीत असुन त्यात अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे ८० पोल्ट्री फार्म असुन ४ लाख कोंबड्या तिथे आहेत. २३९ पोल्ट्री फार्म हे चिकन खाण्यासाठी मौंसाली कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म असून १० लाख कोंबड्या आहेत. ६ ठिकाणी गावरान कोंबड्यांची पैदास फार्म असुन त्यात ६ हजार ८०० पेक्षा ज्यास्त कोंबड्या आहेत.

तालुक्यात जवळपास साडे चौदा लाख कोंबड्यांचे पालनपोषन करून अंडे ,मांस विक्री व्यवसायीक करत असून या पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यावधीची उलाढाल होत असते. मात्र अचानक बर्ड फ्लुचे संकट घोंगावत असल्याने तालुक्यातील व्यवसायीक चिंतेत आहेत. करोनाच्या महा संकटातून बाहेर पडलेल्या नागरीकांनी बर्डफ्लुच्या भितीने चिकन अंड खाण्याचे टाळत असल्याने चिकन व अंड्यांचे दर खालावत आलेल्याने पोल्ट्री व्यवसायीकांची आर्थिक चिंता वाढली आहे.

सन २०२० हे वर्ष करोनाच्या भितीने पोल्ट्री व्यवसायिकांना देशोधडीला लावले. अफवांच्या महापुरात जिवंत कोंबड्या कांद्या – बटाट्यापेक्षाही स्वस्त विकण्याची वेळ आली होती. काहींनी तर लाखो जीवंत कोंबड्या खड्यात पुरल्या तर कांहींनी निर्जनस्थळी सोडून दिल्या. कोट्यावधी रुपयांचे नुकसान करोनाच्या अफवेने झाले होते. या करोना संकटातुन पोल्ट्री व्यवसायीक कसा बसा बाहेर निघतोय तोच पुन्हा बर्ड फ्लुचा सामना करण्याची वेळ आल्याने पोल्ट्री व्यवसायीकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.