कोपरगाव, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका कार्यकारिणीच्या शिवसेना आघाडीच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
मागील महिन्यात उबाठा सेनेच्या युवा सेना तालुकाप्रमुख पदाचा अभिषेक आव्हाड तर उपतालुका प्रमुखपदाचा अक्षय गुंजाळ यांनी राजीनामा दिला होता. काल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये शिवसेनेच्या युवा सेना तालुका प्रमुखपदी अभिषेक आव्हाड तर युवा सेना उपतालुकाप्रमुखपदी अक्षय गुंजाळ यांची निवड करण्यात आली.
सोनेवाडी येथील प्रवीण सोमनाथ शिंदे यांची युवा सेनेच्या जिल्हा कार्यकारिणीवर वर्णी लागली. जिल्हा समन्वयकपदी त्यांची निवड करण्यात आली. मढी येथील किरण गवळी यांची युवा सेना उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाली. शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून शिवसेना संघटना बांधणीसाठी अभिषेक आव्हाड, अक्षय गुंजाळ, किरण गवळी व प्रवीण शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.
याच कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींकडे त्यांना युवा सेनेचे पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळावी म्हणून शिफारस व पाठपुरावा केला होता, असे औताडे यांनी सांगितले. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडीचे कोपरगाव शहर व तालुका शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले