दुबई – प्ले-ऑफ गटात स्थान मिळवण्याचे कोलकाता नाईट रायडर्सच्या स्वप्नांना चेन्नई सुपर किंग्जने धक्का दिल्यामुळे त्यांची आज राजस्थान रॉयल्सशी होणारी लढत अत्यंत महत्त्वाची बनली आहे. या सामन्यात जर कोलकाताला पराभवाचा सामना करावा लागला व दुसरीकडे पंजाबने चेन्नईचा पराभव केला तर कोलकाताचे स्पर्धेतील अव्हान संपुष्टात येणार आहे.
कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, राहुल तेवतिया, यशस्वी जयस्वाल, डेव्हिड मिलर, रॉबिन उथप्पा अशी तगडी फलंदाजी असल्याने त्यांना रोखण्यासाठी कोलकाताच्या गोलंदाजांना भक्कम योजना तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. राजस्थानची गोलंदाजी जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट, टॉम कुरेन व तेवतिया यांच्यावर अवलंबून आहे.
कोलकाताबाबत बोलायचे झाले तर कर्णधार इयान मॉर्गन, दिनेश कार्तिक यांना येत असलेले अपयश त्यांना भोवत आहे. तसेच अष्टपैलू म्हणून गाजावाजा केलेल्या आंद्रे रसेलने संपूर्ण स्पर्धेत निराशा केली आहे. त्याचाही त्यांना महत्त्वाच्या सामन्यांमध्ये फटका बसलेला आहे.
शुभमन गिल, नितीश राणा वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाने एकहाती सामना जिंकून दिलेला नाही. त्यामुळेच आज त्यांना राजस्थानकडून पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांना या गटात प्रवेशाची संधीच मिळणार नाही. दुसरीकडे राजस्थानसाठी या स्पर्धेत आता कमावण्यासारखे काहीही शिल्लक नसल्याने ते बिनधास्तपणे खेळ करत कोलकातावर वर्चस्व राखण्यासाठीच मैदानात उतरतील.