पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सहाव्या दिवशी केदार जाधव(85 धावा) व अंकित बावणे(63धावा) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने सोलापूर रॉयल्स संघाचा 26 धावांनी पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली.
या स्पर्धेत पहिल्या सामन्यात सोलापूर रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात भारतीय खेळाडू केदार जाधवने 52 चेंडूत 11 चौकार व 3 षटकारांसह 85 धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली. त्याला अंकित बावणेने 47चेंडूत 9चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी करून साथ दिली. सलामीच्या जोडीने 97 चेंडूत 154 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली.
कोल्हापूर संघ 16.3 षटकात 2बाद 156 धावा असा सुस्थितीत होता. उर्वरित षटकात सोलापूर रॉयल्स संघाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केले. सोलापूरच्या प्रथमेश गावडे(2-54), सत्यजीत बच्चाव(1-32), प्रणव सिंग(1-35), सुनील यादव(1-36) यांनी सुरेख गोलंदाजी करत कोल्हापूर संघाला निर्धारित 20 षटकात 5 बाद 186 धावांवर रोखले.
याच्या उत्तरात सोलापूर रॉयल्स संघाला 20 षटकात 8 बाद 160 धावा करता आल्या. सलामीचा फलंदाज प्रवीण दिशेट्टीने 45 चेंडूत 3चौकार व 3 षटकारासह 53 धावांची संयमी खेळी केली. कोल्हापूरच्या मनोज यादव(3-26), अक्षय दरेकर(1-31), आत्मन पोरे(2-22), निहाल तुसामद(1-29) यांच्या अचूक माऱ्यापुढे सोलापूर संघाचे फलंदाज कालांतराने एकापाठोपाठ एक बाद होत गेले व त्यामुळे आव्हान अधिकच कठीण झाले. त्यांचा डाव 8बाद 160 धावाच करू शकला व या सामन्यात कोल्हापूर संघाने 26 धावांनी विजय मिळवला. सामनावीर केदार जाधव ठरला.
संक्षिप्त धावफलक
कोल्हापूर टस्कर्स : 20 षटकात 5 बाद 186 धावा. (केदार जाधव 85, अंकित बावणे 63, साहिल औताडे 21, प्रथमेश गावडे 2-54, सत्यजीत बच्चाव 1-32, प्रणव सिंग 1-35, सुनील यादव 1-36) वि. वि.
सोलापूर रॉयल्स : 20 षटकात 8 बाद 160 धावा. (प्रवीण दिशेट्टी 53, अथर्व काळे नाबाद 32, मेहुल पटेल 22, स्वप्नील फुलपगार 19, आत्मन पोरे 2-22, मनोज यादव 3-26, अक्षय दरेकर 1-31, निहाल तुसामद 1-29).