कोल्हापूर (प्रतिनिधी) – येथील सीपीआर रुग्णालयामध्ये आजअखेर 8 करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे. यातील 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित तिघांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरेपी ट्रायल केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. या ऑनलाइन उद्घाटनास पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई येथून सहभागी झाले होते.
यड्रावकर म्हणाले, प्लाझ्मा थेरेपी करोनाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोल्हापूर येथे रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे, अशी माहिती त्यंनी यावेळी दिली. सतेज पाटील म्हणाले, मुंबई येथील रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी कोल्हापूर येथून प्लाझ्मा पाठविण्यात आला होता.
आजअखेर कोल्हापुरातील 8 रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी करण्यात आली आहे. यातील 5 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर आघाडीवर असून मुख्यमंत्री महोदयांनी प्लाझ्मा दान करण्याबाबत आवाहन केले असून त्याला निश्चितपणे कोल्हापूर येथून चांगला प्रतिसाद मिळेल, असेही ते म्हणाले.