कोल्हापूर (प्रतिनिधी): सराईत घरफोडी करणाऱ्या दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. हर्षवर्धन सुरेश पाटील(वय.२५) आणि तेजस तानाजी पाटील(वय.२२ दोघे रा.नेज शिवपुरी, ता.हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने,मोटरपंप,दोन मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन सराईत चोरटे सोन्या-चांदीचे दागिने विकण्यासाठी इचलकरंजी येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी फाटा येथे सापळा रचला.
याठिकाणी सोन्या चांदीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या हर्षवर्धन पाटील आणि तेजस पाटील यांना पोलिसांनी शिताफीने दागिन्यांसह अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी एक वर्षापूर्वी इचलकरंजी बाहुबली येथे घरफोडी केल्याचे सांगितले.
याचबरोबर इचलकरंजी फाटा आणि आळते या भागात घरफोड्या केल्याची कबुली चोरट्यांनी दिलीय. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या चांदीचे एकूण २१४ ग्रॅम वजनाचे दागिने, एक मोटरपंप, दोन मोबाईल आणि एक मोटारसायकल असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अट्टल चोरट्यांकडून आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.