पुणे(प्रतिनिधी) – ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोक्कातील फरार आरोपीस जेरबंद केले आहे. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी असे तब्बल पाच गंभीर गुन्हे दाखल होते. तो एका गुन्हयात मार्च महिन्या पासून फरार होता. नेपच्युन उर्फ नेपश्या पिजारो काळे (34 रा.राक्षसवाडी ता.कर्जत जि.अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दि.13/3/2020 रोजी रात्री 1.20 वा.चे सुमारास मौजे मळद (ता.दौंड) गावचे हद्दीत रेल्वे उड्डाणपुलाजवळ सोलापुर-पुणे हायवे रोडलगत एका ट्रकवरील चालक काशिनाथ रामभाऊ कदम (55 रा.ढोकी ता.कळंब जि.उस्मानाबाद) हे ट्रक रोडचे कडेला लावून लंघुशंकेसाठी गेले होते. ते लंघुशंका करुन परत येत असताना सब रोडने पायी येणारे पाच ते सहा अनोळखी इसमांनी त्यांचे छातीवर चाकूने वार करुन त्याचे जवळील रोख रक्कम तीन हजार रुपये, ड्रायव्हींग लायसन्स, एक पांढरे रंगाचा मोबाईल तसेच त्याचे अगोदर त्याच ठिकाणी थांबलेला टेम्पोवरील क्लीनर महंमद मेहबुब पठाण (49, रा.उस्मानाबाद) याचे खिशातील सॅंमसंग कंपचा मोबाईल व त्याच वाहनावरील चालक अल्ताफ खैयुम पटेल याचे खिशातील रोख 2000 रुपये, ड्रायव्हींग लायसन्स व पाकीट असा एकुण किमत रु 7000 रु. चा माल जबरीने चोरुन नेला होता.
सदर घटनेत ट्रक ड्राॅयव्हर काशिनाथ रामभाऊ कदम यांना औषधोपचारास घेवुन जात असताना ते मयत झाले. तर टेम्पो क्लीनर महंमद मेहबुब पठाण हा जखमी होता. याप्रकरणी ट्रकचा क्लीनर शकील आयुब शेख (रा.कसबे तडवळा ता.जि. उस्मानाबाद) यानी फिर्यादी दिली होती. त्यानूसर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येऊन चार गुन्हेगारांना अटक करण्यात आले.
त्यांचेकडून 2 दरोडा, 5 जबरी चोरी व 2 चोरी असे 9 गुन्हे उघडकीस आणलेले होते. गुन्हयास मोक्का कलम लावण्यात आलेले होते. मात्र गुन्हा घडलेपासून आरोपी नेपच्युन उर्फ नेपश्या पिजारो काळे हा फरार होता. नेपच्युन हा पोलीसांचे भितीने चाकण , माळशिरस, श्रीगोंदा,कर्जत, पाटोदा,बीड येथे रानावनात राहून वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.
दरम्यान, बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास तो मिरजगाव (ता.कर्जत जि.अहमदनगर) येथे येणार असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी वेशांतर करून स्थानिक पोलीसांचे मदतीने कोबींग ऑपरेशन करून नेपच्युन यास ताब्यात घेतलेले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व पथकातील पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पोलीस नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अंकुश ढवळे यांनी केलेली आहे.