कोल्हापूर – जिल्ह्यातील यड्राव इचलकरंजी येथील में.मतीन टेक्सटाईल्स या थ्री फेज औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांने वीजमीटरमध्ये फेरफार करून 81 हजार 126 युनिटची वीजचोरी केली असून त्याची रक्कम 43 लाख 36 हजार 490 रूपये इतकी होते. सदर वीजचोरी प्रकरणी मालक असिफ आयुब मोमीन यांचेविरूध्द आज दि.29 ऑक्टोबर 2021 रोजी जुना राजवाडा, कोल्हापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली.
महावितरणच्या भरारी पथकाने 06 ऑक्टोबर 2021 रोजी यड्राव इचलकरंजी येथील में.मतीन टेक्सटाईल्स या थ्री फेज औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक (105 अश्वशक्ती मंजुर जोडभार) ग्राहकाच्या वीज मीटर व विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष तपासणी केली. सदर तपासणीत वीजमीटर व विद्युत संच मांडणीत वीजमीटर संथ गतीने फिरावे ,अशा हेतूने फेरफार केल्याचे निदर्शनास आले. ॲक्युचेकव्दारे तपासणी केली असता, सदरचे वीजमीटर हे 32.50 टक्के इतक्या कमी गतीने वीजवापर नोंदवित असल्याचे स्पष्ट झाले.
मीटर रिंडींगसाठीच्या एमडीएएस सॉफ्टवेअर प्रणालीनुसार सदर ग्राहक नोंव्हेबर 2020 पासून दररोज रात्री 9 ते सकाळी 8 वाजेपर्यंतच्या वेळात वीजमीटर संथ गतीने फिरावे, अशी योजना मीटरमध्ये छेडछाड करून करीत असल्याचे लक्षात येते. सदर वीजचोरीचा कालावधी 11 महिने इतका निर्धारीत केला असून या कालावधीत 81 हजार 126 युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम 43 लाख 36 हजार 490 रूपये व तडजोड रक्कम रूपये 10 लाख 50 हजार एवढे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले आहे. ग्राहकास वीजचोरी व दंडाचे बिल दिलेले आहे.
सदर वीजचोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा 2003, कलम 135 अन्वये संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर श्री. शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.राकेश मगर, सहाय्यक अभियंता श्री. नितीन जोशी, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी श्रीमती वर्षा जाधव व तंत्रज्ञ श्री.राजेंद्र कोरवी यांनी सहभाग घेऊन ही मोहिम यशस्वी केली.