हडपसर – येथील औद्योगिक वसाहती मागील मुठा कालव्यालगत दोन्हीही बाजूने नव्याने होत असलेल्या व काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व पालिकेने संयुक्तपणे कारवाई सुरु केली आहे.
या सुमारे तीनशेच्यावर झोपड्यांवर ही कारवाई होत आहे. पाच जेसीबी, डंपर तसेच पाटबंधारे विभाग, पालिका व पोलीस असे सुमारे चारशे कर्मचारी ही कारवाई करीत आहेत. येथील पाटबंधारे विभागाच्या मोठ्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमणे झालेली आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई चालू झाली आहे. मागील महिन्यातही येथे कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा याठिकाणी नव्याने झोपड्या बांधल्या जात होत्या.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे, राजू अडागळे यांच्या नेतृत्वाखाली तीनही विभागातील सुमारे चारशे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. कारवाई सुरू होताना झोपडपट्टीधारक व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.