दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच हिटमॅन रोहित शर्मानेही दुसरे स्थान कायम राखले आहे.
बुधवारी झिम्बाब्वे व पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर आयसीसीने ही क्रमवारी जाहीर केली. ही मालिका पाकिस्तानने 2-1 अशी जिंकली असून त्यांचा सर्वात अव्वल फलंदाज बाबर आझमने क्रमवारीत प्रगती केली असून तो तिसऱ्या स्थानावर आला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली 871 गुणांसह पहिल्या तर रोहित शर्मा 855 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बाबर 837 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर आहे. सांघिक क्रमवारीत इंग्लंड 123 गुणांसह अव्वल स्थानी तर, भारतीय संघ 119 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.