नवी दिल्ली – खरिपाचा कांदा उपलब्ध होऊ लागला आहे. त्याचबरोबर कांद्याची आयात होणार आहे. यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याचा दावा नाफेड या सहकारी संस्थेने केला आहे.
मात्र विविध शहरातून आलेल्या वृत्तानुसार शहरातील घाऊक बाजारात कांद्याचे दर अजूनही 80 ते 100 रुपये प्रतिकिलो या पातळीवर आहेत.
नाफेडने 15 हजार टन कांदा आयात करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. या निविदाना देशातील आयातदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता लवकरच 15 हजार टन कांदा देशातील प्रमुख बंदरावर उपलब्ध होणार असल्याचे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यांना त्यांना किती कांदा हवा आहे याची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यामुळे बंदरावरून हा कांदा लगेच संबंधित राज्यातील शहराकडे पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर आगामी काळात कांद्याची टंचाई भासू नये म्हणून आयातदाराच्या माध्यमातून नाफेड कांदा आयात करणार आहे.
भारतीय ग्राहक ज्या आकाराचा आणि रंगाचा कांदा वापरतात तसाच कांदा आयात केला जाणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे आयात केलेला कांदा वाया जाणार नाही.