IPL 2024 (Live Cricket Score PBKS vs GT) : आज (रविवार,21 एप्रिल) आयपीएल 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला . पंजाब किंग्जने दिलेल्या 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने 20 व्या षटकात 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. गुजरात हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण पंजाबच्या गोलंदाजांनी शेवटपर्यंत हार मानली नाही आणि सामना 19व्या षटकापर्यंत नेला.
गुजरातकडूनही एकाही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही. पण, 3 फलंदाजांनी 30+ धावा केल्या आणि त्यांच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. गुजरातच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर वृध्दिमान साहा 13, शुभमन गिल 35, साई सुदर्शन 31, डेव्हिड मिलर 4, अजमतुल्ला ओमरझाई 13, शाहरुख खान 8, रशीद खान 3 धावा करून बाद झाले. तर राहुल तिवती 18 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 36 धावा करून नाबाद माघारी परतला.अशाप्रकारे गुजरात संघाने 5 चेंडू बाकी असताना 7 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि 3 गडी राखून विजय मिळवला.
पंजाबकडून हर्षल पटेलने तीन आणि लियाम लिव्हिंगस्टोनने दोन गडी बाद केले. तर अर्शदीप सिंग आणि सॅम करन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना पंजाब किंग्जने 20 षटकात सर्वबाद 142 धावा केल्या. पंजाबची सुरुवात चांगली झाली कारण प्रभसिमरन सिंग आणि सॅम करन यांनी 52 धावांची भक्कम भागीदारी केली. प्रभासिमरनने 21 चेंडूत 35 धावांची खेळी केली, तर करनने 19 चेंडूत 20 धावा केल्या. शिखर धवनही या सामन्यात खेळला नाही. विशेषत: पीबीकेएसची मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. रिले रौसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या सामन्यात बॅटने काही खास दाखवू शकले नाहीत. विशेषत: मधल्या षटकांमध्ये नूर अहमद आणि साई किशोर यांनी पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
पंजाब संघाने 100 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत हरप्रीत ब्रार आणि हरप्रीत भाटिया यांनी जबाबदारी घेतली. एकेकाळी संघ 130 धावांच्या खाली घसरण्याच्या मार्गावर होता. मात्र ब्रार आणि भाटिया यांच्यातील 40 धावांच्या भागीदारीमुळे संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आले. हरप्रीत ब्रारने 12 चेंडूत 29 धावांची तुफानी खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये हरप्रीत भाटियाने 19 चेंडूत 14 धावा करत पंजाबला 142 धावांपर्यंत मजल मारून दिली. जितेश शर्मा व्यतिरिक्त पंजाबच्या मधल्या फळीतील कोणीही धावांच्या बाबतीत दुहेरी आकडा गाठू शकला नाही.
गुजरातची सर्वोत्तम गोलंदाजी…
गुजरात टायटन्सकडून उत्कृष्ट गोलंदाजी झाली. संदीप वारियरच्या षटकात आलेल्या 21 धावा वगळता गुजरातच्या गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. नूर अहमदने 4 षटकात केवळ 20 धावा देत 2 बळी घेतले, तर राशिद खानने आणखी कठोर गोलंदाजी करत केवळ 15 धावा दिल्या आणि 1 बळीही घेतला. गुजरातकडून सर्वोत्तम गोलंदाजी साई किशोरने केली, ज्याने 4 षटकात 33 धावा देत 4 बळी घेतले. त्याच्याशिवाय मोहित शर्मानेही महत्त्वाच्या प्रसंगी 2 बळी घेतले.