मंगळूरू – कर्नाटकमधील उडूपी जिल्ह्यातील एका सरकारी कंत्राटदाराला आत्महतेस प्रवृत्त केल्याबद्दल कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ईश्वरप्पा यांना प्रथम आरोपी करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
यामुळे राज्य मंत्रिमंडळातून ईश्वरप्पा यांच्या हकालपट्टीची मागणी विरोधकांनी करायला सुरुवात केली आहे. ईश्वरप्पा यंच्याशी समक्ष बोलून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती घेणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.
कंत्राटदार संतोष पाटील यांनी ईश्वरप्पा यांच्यावर लाचखोरीचे आरोप लावले होते. त्यानंतर उडूपी येथील एका लॉजमध्ये पाटील मृतावस्थेत आढळले होते. संतोष पाटील यांच्या मृत्यूस ईश्वरप्पा हेच जबाबदार असल्याची तक्रार पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील यांनी पोलिसांकडे केल्यानंतर “एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीमध्ये ईश्वरप्पा आणि त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे.
2020-2021 साली हिंदालगा गावातील सार्वजनिक रस्त्याचे आणि अन्य काही काम संतोष पाटील यांना देण्यात आले. पाटील यांनी 4 कोटी रुपयांचे काम केले. मात्र त्या कामाच्या पैशांमधील 40 टक्के वाटा ईश्वरप्पा यांच्या निकटवर्तीयांनी कमिशन म्हणून मागितला, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
कंत्राटदाराच्या आत्महत्येसारखी 100 प्रकरणे आपण बघितली आहेत. या प्रकरणी आपण कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही, असे कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे.