IPL Impact Player Rule Controversy :- आयपीएलमध्ये लागू केलेल्या इम्पॅक्ट प्लेअर अर्थात प्रभावशाली खेळाडू नियम निरुपयोगी असून त्याचा कोणताही फायदा भारतीय क्रिकेटला होणार नाही. प्रत्येक वेळेस नवनव्या नियमांनी क्रिकेटमधील प्राण हरवत चालला आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियम हा क्रिकेटसाठी मोठा धोका आहे त्यामुळे मला हा नियम फारसा पसंत पडलेला नाही, अशा शब्दांत मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) या नियमाबाबत स्पष्टपणे आपले मत सांगितले आहे.
एका पॉडकास्टमध्ये रोहित म्हणाला, ‘मी इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा फार मोठा चाहता नाही. हा नियम अष्टपैलू खेळाडूंना मागे ढकलणार आहे. क्रिकेट हा साधारणपणे 11 खेळाडूंसह खेळला जाणारा खेळ आहे, 12 नव्हे. अशा सामन्यांद्वारे तुम्ही लोकांचे भरपूर मनोरंजन करता. नवीन नियम वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे सारख्या अष्टपैलू खेळाडूंना मदत करणार नाही. सुंदरला सनरायझर्स हैदराबादकडून कमी सामने खेळायला मिळतात, तर चेन्नई सुपर किंग्जकडून भरपूर धावा करणाऱ्या शिवम दुबेने आतापर्यंत या स्पर्धेत गोलंदाजी केलेली नाही. हे कसले क्रिकेट आहे?
रोहित म्हणाला, मला वाटते की शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांना गोलंदाजी मिळत नाही ही आमच्यासाठी चांगली गोष्ट नाही. यातून तुम्ही काय साध्य कराल हे मला समजत नाही. सामना कसा चालला आहे आणि खेळपट्टीचा विचार करून, तुम्ही प्रभावशाली खेळाडू तयार कराल.
जर तुम्ही चांगली फलंदाजी केली आणि विकेट गमावल्या नाहीत तर तुम्ही एक गोलंदाज निवडाल जो तुम्हाला सहाव्या किंवा सातव्या गोलंदाजाचा पर्याय देईल. तुम्हाला अतिरिक्त फलंदाजाची गरज नाही कारण अनेक संघ चांगली फलंदाजी करत आहेत आणि तुम्ही सात किंवा आठ क्रमांकाचा फलंदाज क्वचितच आला असेल.