दुबई :– कोलकाताचे तीन फलंदाज शून्यावर माघारी परतल्यानंतरही कर्णधार इयोन माॅर्गनच्या नाबाद अर्धशतकी तर शुभगन गिल आणि राहुल त्रिपाठी याच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर कोलकात नाईट रायडर्सने राजस्थानसमोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान ठेवले आहे. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने गोलंदाजी स्विकारताना कोलकाता संघास फलंदाजीस पाचारण केलं होते. त्यानंतर कोलकाताने 20 षटकांत 7 गडी गमावत 191 धावापर्यंत मजल मारली.
कोलकाताकडून फलंदाजीत इयोन माॅर्गनने 35 चेंडूत (5 चौकार व 6 षटकार) नाबाद 68 धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने 39(34), शुभमन गिलने 36(24), आंद्रे रसेलने 25(11) आणि पॅट कमिन्सने 15(11) धावा केल्या. कोलकाताचे तीन फलंदाज नितीश राणा, सुनील नरेन आणि दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाले.
राजस्थानकडून गोलंदाजीत राहुल तेवतियाने 4 षटकांत 25 धावा देत सर्वाधिक 3 तर कार्तिक त्यागीने 4 षटकांत 36 धावा देत 2 गडी बाद केले. तर जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.