KKR Vs RR : राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मधील 31 वा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. जोस बटलरने शतकासह संघाला सहावा विजय मिळवून दिला. यासह राजस्थान 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल तर कोलकाता आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
मंगळवारी झालेल्या दमदार लढतीत राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा दोन विकेट्स राखून पराभव केला. जोस बटलरने 60 चेंडूत 107 धावांची नाबाद मॅच-विनिंग इनिंग खेळून आपल्या संघाला हरवलेला सामना जिंकून दिला. बटलरच्या बॅटमधून 9 चौकार आणि 6 षटकार आले. बटलर राजस्थानसाठी वन मॅन आर्मी ठरला. सुनील नरेनच्या (109 धावा) शतकामुळे केकेआरने 20 षटकांत 223 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने शेवटच्या चेंडूवर लक्ष्याचा पाठलाग केला.
याव्यतिरिक्त राजस्थानकडून रियान पराग यानं 14 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि चार चौकार ठोकले. शेवटी पॉवेल यानं बटलरच्या साथीने पुन्हा एकदा डावाला आकार दिला. रोव्हमन पॉवेलने 13 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 26 धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
केकेआरकडून हर्षित राणा, सुनील नरेन आणि वरूण चक्रवर्ती प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर वैभव अरोराच्या खात्यात एक विकेट आली. मिचेल स्टार्क या सामन्यातही चांगलाच महागडा ठरला. स्टार्कने 4 षटकांत सर्वाधिक 50 धावा दिल्या.
तत्पूर्वी, संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने सुनील नरेनच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान विरुद्ध 20 षटकांत 6 बाद 223 धावा केल्या.
केकेआरकडून सुनील नरेनने 56 चेंडूत 109 धावांची खेळी खेळली. नरेनने आपल्या शतकी खेळीत 11 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. नरेननंतर आंगकृष्ण रघुवंशीने सर्वाधिक 30 धावा केल्या. शेवटी रिंकू सिंग 9 चेंडूत 20 धावा काढून नाबाद परतला. रिंकूने एक चौकार आणि दोन षटकार मारले.
राजस्थानकडून आवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी दोन तर ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.