मेढा – जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील रानफुलांच्या गालिचांचा आनंद यंदा पर्यटकांना लुटता येणार आहे. कोविडमुळे गेल्या वर्षी प्रवेशबंदी असलेल्या कास पठाराला पर्यटक बुधवार, दि. 25 पासून भेट देऊ शकणार आहेत.
करोनाचे नियम पाळून ऑनलाइन व ऑफलाइन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना प्रवेश देण्याचा निर्णय कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मारुती चिकणे यांनी दिली.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी पर्यटनाला बंदी असल्याने फुलांच्या हंगामाचा आनंद पर्यटकांना लुटता आला नव्हता. आता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कार्यकारी समितीने कास पठार पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला.
ऑनलाइन व ऑफलाइन बुकिंग करून आणि कोरोनाचे नियम पाळून पर्यटकांना पठारावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी माणशी 100 रुपये प्रवेश शुल्क आकरण्यात येणार आहे. वाहन पार्किंग, गाइड शुल्क, बस प्रवास, कॅमेरा शुल्क आदींसह अन्य शुल्कही द्यावे लागणार आहेत. बैठकीस सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण व वन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस व ऊन, असा खेळ सुरू असल्याने पठारावर रानफुले उमलू लागली आहेत. रानहळदीच्या पांढऱ्या फुलांसह विविध प्रजातींच्या फुलांच्या कळ्या तुरळक दिसत आहेत.
यामध्ये दीपकाडी, गेंद, चवर, टोपली कारवी, आभाळी, सोनकी यांचा समावेश आहे. येत्या दहा-पंधरा दिवसात पठारवर रंगीबेरंगी फुले पाहायला मिळणार आहेत. सप्टेंबर महिन्यात तर फुलांचे गालिचे अंथरलेले दिसणार आहेत.
कास पठार बुधवारपासून पर्यटकांना खुले करण्यात येणार आहे. गर्दी वाढल्यास फक्त ऑनलाइन बुकिंग आणि प्रवेश मर्यादा निश्चित करण्यात येणार आहे.
– मारुती चिकणे, अध्यक्ष कास पठार कार्यकारी समिती
हंगामासाठी सुरक्षारक्षक, कर्मचारी, गाइड सज्ज झाले असून, अन्य तयारीदेखील झाली आहे. यंदा रानफुलांचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.
– आर. एस. परदेशी, वनक्षेत्रपाल, मेढा
================