काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्याने जागतिक स्तरावर याचे तीव्र पडसाद उमटत असल्याचे दिसत आहेत. त्यातच आता अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतापैकी ३३ प्रांतावर तालिबानने पूर्णपणे कब्जा केला आहे. केवळ पंजशीर एकमेव प्रांतावर अद्याप तालिबानने ताबा मिळवला नाही. परंतु याठिकाणीही तालिबानींनी कूच केली असल्याचेही सांगण्यात येत आहे. पण पंजशीरचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमद मसूदने तालिबानींना तगडी टक्कर दिली आहे.
मसूद आणि अफगाणिस्तानला स्वत:चा राष्ट्रपती घोषित करणारे अमरुल्ला सालेह तालिबानविरोधात रणनीती आखत आहेत.तालिबानने अहमद मसूदला सरेंडर करण्यासाठी ४ तासांचा वेळ दिला आहे. परंतु शरण जाण्यास मसूदनं नकार दिला आहे. तालिबानने मसूदला ४ तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर मसूद याने देखील तालिबानींनासडेतोड उत्तर दिले आहे.
तालिबान्यांना उत्तर देताना मसूदने म्हटले आहे कि , तो तालिबानींसमोर झुकणार नाही. आम्ही सेव्हियत संघाशी टक्कर घेतली होती आता तालिबानींशी टक्कर घेत आहोत. मसूदचे वडील अहमद शाह मसूद हेदेखील अफगाणिस्तानातील तालिबानीविरोधात नेते होते. त्यांनी सेव्हियत संघ आणि तालिबानींविरोधात नेहमी लढाई केली आहे.
तालिबान आणि अलकायदाने कट रचून अहमद शाह मसूद यांना ९/११ हल्ल्याआधी मारुन टाकले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा अहमद मसूद आता तालिबानला संपवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहे. मसूदला पंजशीरमध्ये राहणाऱ्या लोकांची साथ मिळत आहे. अहमद मसूदचे म्हणणं आहे की, तालिबानला विरोध करणारे सरकारी दल आणि विविध प्रांतांतील लोकांनी पंजशीर घाटीला किल्ला बनवलं आहे. जर तालिबानसोबत चर्चा अयशस्वी झाली तर युद्ध होण्यापासून कुठल्याही किंमतीत रोखलं जाऊ शकत नाही. पंजशीर प्रांतात जवळपास १० हजार सैन्य तैनात आहे. जे तालिबानी दहशतवाद्यांविरोधात पूर्ण ताकदीने लढण्यास तयार आहेत.
दरम्यान, तालिबानने दावा केलाय की, त्यांच्या लोकांनी पंजशीर घाटीला चहुबाजूने घेरले आहे. चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्याचसोबत अहमद मसूदला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे अफगाणिस्तानात परिस्थिती चिघळत आहे. अफगाणिस्तानातील मोठी लोकसंख्या तालिबानवर विश्वास ठेवण्यास तयार नाही. काबुल एअरपोर्टवर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. जितक्या शक्य आहे तितक्या लवकर तालिबानच्या जाचातून सुटका व्हावी यासाठी लोक प्रयत्न करत आहेत.