चेन्नई – पुण्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू देविका घोरपडे(लाल जर्सी) हिने हरयाणाच्या निधीला सहज पराभूत करताना ५०-५२ किलो वजनी गटाचे सुवर्णपदक मिळविले. देविकाने उपांत्य फेरीत मागील वर्षीची सुवर्णपदक विजेती हरयाणाच्या मोहिनीला पराभूत केले होते. त्यामुळे अंतिम लढतीत निधीची खूप मोठे आव्हान नव्हते. देविकाने निधीला सहज पराभूत करताना सुवर्ण पदक मिळविले.
या स्पर्धेतील देविकाचे हे चौथे पदक आहे. मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने बॉक्सिंगचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. सध्या ती छत्रपती संभाजीनगर येथील ‘साई’ अकादमी येथे सनी गेहलावत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. मुलांच्या ६०-६३ किलो वजनी गटात अकोल्याच्या गौरव चव्हाण याने रौप्य पदक मिळविले.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समध्ये शेवटच्या दिवशीही पदकांची लयलूट करीत मुले व मुली या दोन्ही गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आणि निर्विवाद वर्चस्व गाजविले. आर्यन दवंडे याने यंदाच्या या स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांची भर घालून सोनेरी चौकार मारला. शताक्षी टक्के हिने देखील सोनेरी कामगिरी करत महाराष्ट्राच्या यशात कौतुकाचा वाटा उचलला. आर्यन याने समांतर बार या प्रकारात सुवर्णपदक जिंकताना १२.५०० गुणांची नोंद केली. त्याने व्हॉल्ट टेबल या प्रकारात १३.२०० गुणांची कमाई करीत सुवर्णपदक जिंकले तर त्याचा सहकारी सिद्धांत कोंडे याने १२.९५० कांस्यपदक जिंकले.
सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
महाराष्ट्र संघाने मुलांच्या गटात सायकलिंगमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळविले. सायकलिंगच्या कयरिंग या प्रकारात पुण्याच्या वेदांत जाधवने सुवर्णपदक प्राप्त केले. वेदांत जाधवचे या स्पर्धेतील दुसरे सुवर्ण ठरले. यापूर्वी वेदांतने सायकल ट्रॅकवर वैयक्तिक २०० मीटर स्प्रींट प्रकारात सुवर्णपदकाची शर्यत जिंकली होती. या स्पर्धेत एकूण त्याने २ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राच्याच वेदांत ताजणे याने महाराष्ट्राला दुसरे कांस्यपदक मिळवून दिले. स्पर्धेत मुलांच्या गटाच्या टीम स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राने रौप्य पदक मिळविले होते. यात संघात मंथन लाटे, वेदांत ताजणे व वेदांत जाधव या तिघांचा समावेश होता. मुलींच्या याच प्रकारात महाराष्ट्राने कांस्य पदक राखले होते. या संघात स्नेहल माळी, सायली अरंडे व श्रीया लालवाणी यांचा समावेश होता.
Khelo India Youth Games 2023 : महाराष्ट्राकडून पदकांची लयलुट, तिसऱ्या दिवशी जिंकली तब्बल 11 पदके…
स्क्वाशमध्ये महाराष्ट्राला रौप्य पदक
मुलींच्या टीम इव्हेंट प्रकारात महाराष्ट्र संघाने रौप्य पदकाची कमाई केली. तामिळनाडू संघाने अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाला पराभूत केले. निरुपमा दुबे, अनिका दुबे, रीवा निंबाळकर व अलिना शहा यांच्या संघाने प्रथमच रौप्य पदकापर्यंत मजल मारली. वैयक्तिक प्रकारामध्ये देखील काल निरुपमा दुबेने रौप्य पदकाची कमाई केली होती.
तलवारबाजीत मुलांना कांस्यपदक
तलवारबाजीतील साब्रे टीम इव्हेंट या प्रकारात १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने कांस्य पदकाची कमाई केली आहे. या संघात शिरीष अंगळ, हर्षवर्धन औताडे, मयूर ढसाळ व स्पर्श जाधव यांचा समावेश आहे. या संघाला अजय त्रिभुवन अजिंक्य दुधारे यांचे मार्गदर्शन लाभले.