मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी अधिकाऱ्यांकडून तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली. बारामती अॅग्रोसंबंधित प्रकरणात ही चौकशी होती. चौकशीनंतर रोहित पवार बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती.
बारामती अॅग्रो कंपनी आमदार रोहित पवार यांच्या मालकीची आहे. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना नोटीस बजावण्यात आली होती. 19 जानेवारी रोजी रोहित पवारांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावून 24 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज त्यांची तब्बल 12 तास ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली असून, बाहेर येताच त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
रोहित पवार म्हणाले, ‘अधिकाऱ्यांना मी सहकार्य करत होतो, त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांना कळत नव्हतं काय करायचं, कारण तुमचे सर्व आवाज त्या ठिकाणी पोहोचत होतं, घोषणा ऐकू येत होत्या असं रोहित पवार म्हणाले. एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो, त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतो असं ज्यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला समजलं त्यावेळी बाप माणूस म्हणून मागे उभे राहतात. असं ते म्हणाले. तसेच, 1 तारखेला चौकशीसाठी परत बोलावलं असल्याचं देखील रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.