बेंगळुरू – भारतातील मानाची समजली जात असलेली खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा यंदा येत्या रविवारपासून (दि.24 एप्रिल ) येथे होणार आहे. ही स्पर्धा 3 मे रोजी संपणार असून, यंदाच्या स्पर्धेत मलखांब व योगासनांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे.
खेलो इंडिया विद्यापीठातर्फे आयोजित होत असलेल्या या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यात नेमबाज मनू भाकर, धावपटू दूती चंद, जलतरणपटू श्रीहरी नटराज, नेमबाज दिव्यांशसिंग पवार, ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर हे प्रख्यात खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
या स्पर्धेत देशभरातील 189 विद्यापीठांचे तब्बल 3 हजार 878 खेळाडू सहभागी होत आहेत. या खेळाडूंसमोर या स्पर्धेतील 20 क्रीडा प्रकारांतील 275 सुवर्णपदकांवर लक्ष राहणार आहे. स्पर्धेदरम्यान डोपिंगविरोधी संस्था (नाडा) खेळाडूंसाठी अभियान चालवणार असून, या स्पर्धेवर केंद्रीय क्रीडा मंत्रालय तब्बल 34.97 कोटी रुपये खर्च करणार आहे.