जळगाव – एका साध्या शिक्षकाच्या मुलाकडे हजार बाराशे कोटी रूपयांची संपत्ती आली कोठून त्याची चौकशी का केली जात नाही असा सवाल करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता टिका केली होती.
त्या आरोपांना आता महाजन यांनीही उत्तर दिले आहे. त्यांनी खडसे यांचीही संपत्ती काढली. ते म्हणाले की, खडसे हे दुचाकीत रॉकेल टाकून हिंडायचे असे त्यांनीच सांगितले आहे. मग त्यांच्याकडेही इतकी संपत्ती आली कोठून याचीही चोैकशी झाली पाहिजे. तुमच्या नावावर ज्या मालमत्ता आहेत त्याचे शंभर-शंभर उतारे आहेत या मालमत्तेची जनतेला माहिती द्या असे आव्हानही महाजन यांनी खडसेंना दिले.
शिक्षकाच्या मुलाकडे हजार बाराशे कोटी रूपयांची संपत्ती कशी असा आरोप खडसे यांनी केला होता, त्यावर बोलताना महाजन यांनी म्हटले आहे की माझ्या संपत्तीची खडसे यांनी खुशाल चौकशी करावी. त्यांचे सरकार मध्ये चांगले वजन आहे आणि आता राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांनी माझी चौकशी करावी असे आव्हानही महाजन यांनी दिले.
आपल्यावर कोणी टीका केली की त्याची बदनामी करायची असे उद्योग सध्या खडसे करीत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे असा आरोपही महाजन यांनी आज जामनेर येथील पत्रकार परिषदेत बोलताना केला. खडसेंना राष्ट्रवादीत आमदार होता आले नाही असा सल त्यांच्या मनात आहे त्यातूनच त्यांनी हा आरोप केला आहे असेही महाजन यांनी म्हटले आहे.