पुणे – खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे पाणीसाठ्यात कमालीची वाढ होत आहे. मागील 24 तासांत या चार धरणांत मिळून तीन टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे खडकवासला प्रकल्पात 19.39 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने तेथून सातत्याने विसर्ग सुरू आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने वेगाने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास 24 हजार 56 क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू होता. यामुळे डेक्कन येथी बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना तसेच गावांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 400 मिमी पाऊस हा टेमघर धरण परिसरात झाला. तर, वरसगावमध्ये 288, पानशेत-288, खडकवासला -55 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
धरणाचे नावपाणीसाठा(टक्के)
खडकवासला1.97 टीएमसी100
पानशेत7.69 टीएमसी72.24
वरसगाव7.87 टीएमसी61.40
टेमघर1.86 टीएमसी50
मुठा नदीत गुरुवारपर्यंत 0.67 टीएमसी विसर्ग
खडकवासला धरणाची एकूण क्षमता 1.97 टीएमसी इतकी आहे. तसेच खडकवासला धरणाच्या वरील बाजूस तीन धरणे आहे. ही धरणे भरल्यास त्यामधून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणातच जमा होते. तीन धरणांतून सोडण्यात येणारे पाणी तसेच खडकवासला धरणात जमा होणारे पाणी या सर्वांचा विचार करून पाणीसाठा नियंत्रित करण्यात येतो. गुरुवारी खडकवासला धरण 70 टक्के भरल्यानंतर त्यामधून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत 0.67 टीएमसी इतके पाणी सोडण्यात येत आहे.