नवी दिल्ली : केरळमध्ये आणखी एकाला निपाहची लागण झाल्यानंतर राज्याचे आरोग्य विभागा अलर्ट मोडवर गेले आहे. केरळमधील निपाह रुग्णांची संख्या 5 वर आली आहे, त्यामुळे केरळमध्ये राज्यसरकारकडून मिनी लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
केरळ राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्यात पाच निपाह रुग्ण आढळल्याची माहिती दिली. त्यासोबतच राज्यावर काही निर्बंध लावण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या व्हयरसविषयी माहिती देताना, ‘राज्य सरकारने संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 700 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी 77 जणांना हाय रिस्क कॅटेगरीत ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
केरळमध्ये याआधीही कोझिकोड जिल्ह्यातील दोन रुग्णांचा निपाहमुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे संपूर्ण केरळमध्ये निपाहचा फैलाव होण्याचा धोका आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. निपाहचे संक्रमण रोखण्यासाठी केरळ प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. हाय रिस्क कॅटेगरीत ठेवण्यात आलेल्या 77 जणांना घराबाहेर न निघण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी निपाहमुळे मृत्यू झालेले दोन रुग्ण ज्या रस्त्यावरुन गेले होते, त्या मार्गांची माहिती लोकांना देण्यात आली आहे, जेणेकरून इतर लोकांनी त्या मार्गाचा, त्या रस्त्याचा वापर करू नये.
कोझिकोड जिल्ह्यात सार्वजनिक उत्सव आणि इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कोझिकोड जिल्ह्यातील 9 पंचायतींचे 58 वॉर्ड कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत, येथे फक्त आपत्कालीन सेवांना परवानगी आहे. आपत्कालीन जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी आहे. केवळ फार्मसी आणि रुग्णालयांना वेळेची मर्यादा नाही. कंटेनमेंट झोनमधून प्रवास करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बस केरळमध्ये थांबवू नये, असे आदेश देण्यात आहे. कोझिकोड जिल्ह्यातील 9 वर्षांच्या मुलाला देखील निपाहची लागण झाली आहे. हा मुलगा व्हेंटिलेटरवर असून त्याच्या उपचारासाठी सरकारने ICMR कडून मोनोक्लोनल अँटीबॉडीज मागवले आहेत.