आयुक्तांचे कर्मचाऱ्यांना आदेश
पुणे – महापालिकेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी तसेच नागरिकांशी बोलताना दोन मीटर अंतर ठेवून काम करावे तसेच कार्यालयामधील वातानुकूलीत यंत्रणा (एसी) बंद ठेवावेत असे आदेश आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. याशिवाय, प्रत्येक विभागात तसेच स्वच्छतागृहांमध्ये तातडीने सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, असे आदेशही त्यांनी दिले आहे. दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाने तातडीने सुरू केली असून महापालिकेत येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझर दिले जात आहे. याशिवाय, मुख्य इमारतीमधील जिने, ग्रील तसेच संगणकाचे “कि’बोर्डचेही निर्जंतूकीकरण केले जात आहे.
शहरातील करोनाच्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक सुरक्षा तसेच काळजी घ्यावी या उद्देशाने आयुक्तांनी सर्व कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांसाठी कार्यालयीन आदेश काढले आहेत.
असे आहेत आदेश…
गर्दी होणारे समारंभ रद्द करावेत
कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर वापरावेत
कार्यालयाच्या दरवाजावरील कडी, कोयंडा जंतूमुक्त करावेत
कर्मचाऱ्यांनी नियमित हातरुमाल वापरावा
कार्यालयात एसीचा वापर टाळावा
आजाराशी संबंधित लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा