विश्‍वचषकापुर्वी भारतीय संघाला धक्‍का, केदार जाधव जायबंदी 

मोहाली – 30 मे पासून इंग्लंडमध्ये विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात होते आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी एक घटना घडली आहे. आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना चेन्नईचा खेळाडू केदार जाधवच्या खांद्याला दुखापत झाली असून तो आगामी सर्व आयपीएल सामन्यांसाठी संघा बाहेर गेला असून त्याची दुखापत गंभीर असल्यास भारतीय संघाच्या विश्‍वचषक स्पर्धेच्या तयारीला ठेच लागण्याची शक्‍यता आहे.

केदार जाधवची लवकरच वैद्यकीय तपासणी केली जाईल. तो लवकर बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. मात्र आयपीएलमध्ये आगामी सामन्यांमध्ये तो खेळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे विश्‍वचषका आधी तो बरा होणे हे आमचे उद्दीष्ट आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी या विषयी माहिती दिली.

14 व्या षटकात ड्‌वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर जाधव सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी रविंद्र जाडेजाने केलेला ओव्हर थ्रो थांबवण्यासाठी जाधवने प्रयत्न करत चेंडू थांबवला. मात्र, या प्रयत्नात त्याच्या खांद्याला दुखापत झाली. यानंतर चेन्नईच्या वैद्यकीय टीमने तात्काळ केदारवर उपचार केले. त्यामुळे आगामी काळात केदार दुखापतीमधून कधी सावरतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

आयपीलच्या व्यस्त वेळापत्रकातून केदार जाधवला एकाही सामन्यात विश्रांती देण्यात आली नव्हती त्यामुळे इतक्‍या व्यस्त वेळापत्रकात त्याच्यावर ताण देखील आला असण्याची शक्‍यता असून त्याला या मुळे संघातून बाहेर बसावे लागल्यास त्याचा फायदा त्याला विश्‍वचषकापुर्वी आवश्‍यक असलेल्या विश्रांती साठी होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.