टॅंकर संख्या अन्‌ खेपांचा मेळ लागेना

विकतच्या पाण्यावरच जामखेडकर भागवितात तहान, टॅंकर माफियांची चांदी; अनेक टॅंकर गळकेच

पालकमंत्र्यांच्या जामखेडमध्ये पाणी विकत घेण्याची वेळ
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघात जामखेड तालुका असून जामखेडकरांवर सध्या तरी विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. त्यात टॅंकरची सुरू असलेली लॉंबिंग पाहता यांना राजकीय आश्रय असल्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. प्रत्येक भागासाठी एक टॅंकर व त्यानंतर नळ कनेक्‍शनमधून पाणी देण्यासाठी टाकीत 24 टॅंकरमधून पाणी सोडले जाते. एवढे होऊन जामखेडकरांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे याकडे पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ओंकार दळवी
जामखेड – जामखेड शहरात दुष्काळाची छाया अधिक गडद होत चालली आहे. शासकीय टॅंकर संख्या व खेपांचा मेळ लागत नसल्याने नागरिकांना विकतच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. मोठा 1200 ते 1500 रुपये टॅंकर तर लहान 120 रुपयामध्ये ड्रमभर पाणी विकत घेण्याची वेळ जामखेडकरांवर आली आहे. सध्याला नगरपालिकेमार्फत प्रत्येक प्रभागात 21 टॅंकरने पाणीपुरवठा तर केला जात आहे. पण थेट पाण्याच्या टाकीत 24 टॅंकरने पाणी सोडून शहरातला नळ कनेक्‍शनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

या 24 टॅंकरच्या 49 खेपा सुरू आहेत. तरी जामखेडकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. जामखेड शहरासह आसपासच्या वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव आटल्याने शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टॅंकरच्या पाण्यावरच तहान भागवत आहे. गाव परिसरातील विहिरीसह बोअरवेल्स कोरडे पडल्याने टॅंकर माफियांची चांदी सुरू झाली आहे.लोकसंख्येचा आकडा पाहिला तर टॅंकरने होणारा पुरवठा अगदी तोकडा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत.

प्रशासन कागदी घोडे नाचवून शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा होत असल्याचा आव आणत आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा करणारे टॅंकर अधर्वट भरून जातात तर काही ठिकाणी नेमलेल्या उद्धभववरून टॅंकर न भरता जवळील पाण्याच्या स्रोतावरून टॅंकर भरण्याचेही प्रकार तालुक्‍यात होत आहे. टॅंकरचे बिल देताना मात्र नेमलेल्या ठिकाणावरूनचे किमी अंतर बिलामध्ये धरले जाते, अशा धक्कादायक प्रकारामुळे टॅंकर लॉबिंग सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याकडे प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

दुष्काळाचा फायदा घेऊन सध्या परिसरात टॅंकर माफियांची लॉबिंग सुरू आहे. शासकीय टॅंकर निम्मे खाली करून निम्मे माघारी घेऊन विक्री करण्याचा हा व्यवसाय सध्या परिसरात सुरू आहे. पंचायत समितीमार्फत तालुक्‍यातही सध्या टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात जास्तीचे अंतर दाखवून दिवसाला ज्या ठिकाणी एक खेप केली जाते. त्या ठिकाणी दोन खेपा दाखवून शासनाला चुना लावण्याचा प्रकार सुरू आहे. गावालगतची एकही विहीर अधिग्रहित केली नसल्याने पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. शिवाय कागदोपत्री खेपा पूर्ण असल्याचा देखावा नगरपालिक व पंचायत समिती करत असली तरी टॅंकरच्या पाण्याचा खेळ नक्कीच सुरू आहे.

शहराच्या अनेक भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना खासगी टॅंकरचे पाणी विकत घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे टॅंकरमालकांचा दररोज लाखो रुपयांचा धंदा सुरू आहे. येथील नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्याचा शोध घेऊन काही विहिरी अधिग्रहित करणे अपेक्षित असताना नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच ग्रामीण भागातील गावात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वाड्यावस्त्यांवर देखील पाणीपुरवठा केला जात आहे.

ग्रामीण भागातील रस्ते खराब असतात. या रस्त्यांवरुन जाताना टॅंकरमधील बरेचसे पाणी वाया जाते. काही वेळेस टॅंकरला गळती लागलेली असते. टॅंकरमधून पाणी गळत असल्याचे पाहण्यास मिळते. यातून देखील हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे.पाणीटंचाईमुळे पाण्याचा थेंबन्‌ थेंब’ वाचवण्याचा सल्ला दिला जात आहे, पण प्रत्यक्षात प्रशासनाकडूनच पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. पाण्याचे बहुतांश टॅंकर गळके आहेत. त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे अजून एक ते दोन महिन्यांपर्यंत या भागातील लोकांना पाण्यावाचून तडफडायचे आहे.

शहरासह तालुक्‍यात टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो, मात्र प्रत्यक्षात किती टॅंकर पाणीपुरवठा करतात? टॅंकरचे पाणी पूर्ण क्षमतेने भरतात का? टॅंकरवर देखरेख करण्यासाठी कोणाची नेमणूक आहे? टॅंकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे प्रत्यक्षात किती नागरिकांना किती पाणी मिळते? याची काहीच माहीत नाही, प्रशासनाने पाण्याबाबत लॉबिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, लोकांचे पाण्यावाचून हाल थांबवावेत.

लक्ष्मण कानडे, मनसे नेते, जामखेड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.