कोल्हापूर : राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा एकदा मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. मात्र अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याविषयी माहिती दिली आहे.
साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेता येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली आहे. कोरोनामुळे बंद असलेले अंबाबाईचे गाभारा दर्शन उद्यापासून म्हणजेच 29 ऑगस्ट सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
गाभार दर्शन सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. तसेच देवीची ओटी देखील भरताा येणार आहे. कोरोना काळापासून मुखदर्शन सुरू करण्यात आले होते. कोल्हापूरच्या अंबाबई मंदिरात गर्दीचा ओघ कायम आहे. सुट्टीच्या दिवशी तर मंदिर भाविकांनी हाऊसफुल्ल असते. श्रावण महिन्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या दोन ते अडीच महिन्यांनी उघडून मोजणी केली जाते. या महिन्यात देखील मोजदाद सुरु होती. एकूण 70 लाख 622 रुपये भक्तांनी देवीच्या चरणी अर्पण केले आहेत. यामध्ये चिल्लरचा सुद्धा समावेश आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भक्त येत असतात. मंदिरात भरभरुन दान देण्यासह उपयुक्त वस्तूही भक्तांकडून भेट देण्यात येतात. एका पुणेकर भक्ताने अंबाबाईसाठी 5 किलो 832 ग्रामचे चांदीचे तोरण अर्पण केलं आहे. तोरणाची अंदाजी किंमत रू 4,94,188 रुपये इतकी आहे.त्यामुळे देवीची दर्शनी बाजू आणखी आकर्षक झाली आहे.